Saturday, February 14, 2015

असावा सुंदर चॉकलेटचा गणपती?

चंदेरी सोनेरी चमचमती मूर्ती. न्यूयॉर्कसिटीत एका दुकानात चॉकलेटचे गणपती मिळतात: तीन इंच उंचीचे, सोन्याचा वर्ख लावलेले.

त्याला एका हिंदू गटाने आक्षेप घेतला आहे. गटाच्या अध्यक्षांच म्हणण असं कि विघ्नहर्त्याच्या मूर्ती देवळात किंवा घरातल्या देव्हाऱ्यात पूजायच्या असतात. वाटेल तशा खायच्या नसतात. त्यांच्या बातमी पत्रकात अध्यक्ष म्हणतात कि चॉकलेटचे गणपती विकणं हा हिंदूंचा अपमान आहे. दुकानदारानी म्हणजे दुकानदारीणीनं त्या विकणं बंद करावं.

त्या दुकानात गणपती बरोबरच चॉकलेटचे बुद्ध, येशुख्रिस्त आणि मोझेसहि मिळतात. दुकानाच्या मालकीणबाईं लिंडा स्टर्न म्हणतात कि, "त्यांच्या दुकानात सर्वधर्मसमभावानुसार सगळ्या धर्मांच्या मूर्तींना आदरानी आणि मानानी वागवलं जातं." त्या विकणं बंद करायचा त्यांचा काही इरादा नाही.

म्हणून न्यूयॉर्क टाईम्सच्या वार्ताहारानी काही लोकांची मतं जाणून घ्यायचा प्रयत्न केला (A Diety Made of Chocolate Spurs a Religious Debate, फेब्रुवारी९,२०१५). क्विन्स मधल्या गणेश मंदिराच्या अध्यक्षा म्हणाल्या कि, "आम्हां हिंदूंच्या दृष्टीकोनातून विश्व अविनाशी आहे आणि देव सर्वव्यापी आहे. त्यामुळे आम्ही असं म्हणणार नाही कि केवळ त्या छोट्याशा चॉकलेटच्या मूर्तीत देव आहे. उलट ते खाल्ल तर खाणाऱ्यात देवाचा प्रवेश होईल. आमच्या भारतीय मुलांना अशी चॉकलेट खायला नक्कीच आवडेल."

त्यांच्या मताशी सहमत होणं मला जरा कठीण जातय. आभारप्रदर्शनाच्या दिवशी चॉकलेटची टर्की, नाताळच्या मोसमात सांताक्लॉज सर्रास खाल्ले जात असले तरी गणेशाला चावून खायची कल्पना कशीशीच वाटते. एखादया लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर गणपतीच चित्र असेल तर ते लग्न लागून बरेच दिवस झाले तरी ती पत्रिका कचऱ्याच्या टोपलीत टाकणं माझ्या आईच्या फार जीवावर यायचं. पण लिंडाबाई गेली पाच वर्ष चॉकलेटचे गणपती विकतायत म्हणजे खुद्द गणेशाचा त्याला कदाचित आक्षेप नसावा. नाहीतर त्यानं नक्कीच त्यात विघ्न आणलं असतं.

ग्वादालुपेच्या व्हर्जीनची चॉकलेटची मूर्तीही त्या दुकानात मिळते. आवर लेडी ऑफ ग्वादालूपे चर्चचे पादरी म्हणाले कि, "आमच्या मते सर्व धार्मिक मूर्ती आणि प्रतिमा ह्या पवित्र वस्तू असतात आणि देव आणि दैवीशक्तींशी संपर्काचं साधन असतात. त्यामुळे त्यांचं खायच्या वस्तूत रुपांतर करून त्या विकणं मला योग्य वाटत नाही. पण काही लोकांना केवळ धंदयाशी मतलब असतो."

स्टर्नबाई म्हणाल्या कि काही वर्षांपूर्वी त्यांच्या चॉकलेटच्या मूर्तींवरील लेख वाचून चायना टाऊन मधल्या बौद्ध धर्मियांनी त्यांच्या दुकानावर बहिष्कार घालायची धमकी दिली होती. पण त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं. त्या भागात त्यांची काही गिऱ्हाईकं नाहीत. त्यामुळे ते प्रकरण तिथेच संपल.

हून लय हे तिबेटी बुद्ध लामा म्हणाले कि, "बऱ्याच बौद्ध लोकांना बुद्धाची मूर्ती खाणं अपमानास्पद वाटेल आणि तसं केल्याने कुकर्मात भर पडेल असं ते मानतील. पण प्राचीन बौद्ध ग्रंथांच्या शिकवणीनुसार बुद्धाचा अपमान करणाऱ्यांवर रागावणाऱ्यांनी स्वतःला बुद्धाचे अनुयायी म्हणवून घेऊ नये. दलाई लामांची ती आवडती शिकवण आहे. तस जरी असलं तरी ते स्वतः बुद्धाची मूर्ती खातील असं वाटत नाही."

न्यूयॉर्कच्या रोमन कॅथलिक आर्चडायसेसचा प्रवक्ता म्हणाला कि त्यांना आठवतय कि एका कॅथलिक संस्थेच्या भोजन समारंभात पाहुण्यांना पांढऱ्या चॉकलेटपासून बनवलेल्या व्हर्जीन मेरीच्या प्रतिमा देण्यात आल्या होत्या. "त्यात काही  अधार्मिक आहे असं मला वाटत नाही. कुठल्या उद्देशानं त्या प्रतिमा बनविण्यात आल्यात हे महत्वाचं."

जितके लोक तितकी मतं. न जाणो भारतातही काही लोकांना हि कल्पना आवडेल. गणेशोत्सवात घराघरात चॉकलेटचे गणपती दिसू लागतील. त्यांच्या विसर्जनाचा प्रश्न आपोआपच सुटेल. गणपती होऊन गेल्यावरही पुढे कित्येक दिवस घरातल्या लोकांना थोडा थोडा गणेशाचा "प्रसाद" खाता येईल आणि गणेशाशी एकरूप होता येईल.

शेवटी लॉर्ड गणेशाच काय ते ठरवेल: त्याला चांदीचं व्हायचं असेल तर तो चांदीचा होईल, शाडूच व्हायचं असेल तर शाडूचा आणि चॉकलेटचं व्हायचं तर चॉकलेटचा!