Friday, October 31, 2014

उ आणि इ (बोला!)

अमेरिकन प्रसार माध्यमांमध्ये फार घबराट पसरली आहे. आफ्रिकेतून एक रोग इथे घुसू पहातोय. त्याला थोपवण्यासाठी कसुन प्रयत्न करण्यात येत आहेत. आफ्रिकेतून परत आलेला, त्या रोगाची लागण झालेला एखादा रुग्ण आढळला तर त्याला/ तिला तात्काळ हॉस्पीटलच्या खास एकांतवास कक्षात पाठवलं जात. त्यांना एकांतवासात घेऊन जाणारे वैद्यकीय कर्मचारी अंतराळविरांसारखे सगळं अंग झाकणारे संरक्षणात्मक कपडे घालूनच त्या रुग्णांच्या जवळपास जातात. तो रोग देशात पसरू नये ह्यासाठी सर्वतोपरीने दक्षता घेतली जात आहे. त्याची लस अजून उपलब्ध नाही. पण ती विकसीत करण्यात येत आहे अशी बातमी आहे.

काही दिवसांपूर्वी एका शाळेच्या प्रिन्सिपलनी सर्व पालकांना ईमेल पाठवली. शाळेतील काही मुलांच्या आयांनी प्रिन्सिपलना कळवलं की त्यांना त्यांच्या मुलांच्या केसात उवा सापडल्यात. प्रिन्सिपल ईमेल मध्ये म्हणाले कि सध्या शाळेचं वेळापत्रक फार फ़ुल्ल आहे . आम्ही काही बाहेरून विशेषज्ञ आणून सगळ्या मुलांचे केस तपासु शकत नाही. तेंव्हा सर्व पालकांनी आपापल्या पाल्यांची डोकी तपासावीत (आणि बरोबर स्वतःचीही?) आणि उवा आढळल्यास तात्काळ उपाययोजना करावी. जर उपाययोजनांन संबधीत काही प्रश्न असतील किंवा मदत हवी असेल तर शाळेच्या नर्सशी संपर्क साधावा.

मुलाच्या प्राथमिक शाळेत वर्षातुन दोनदा, मोठ्या सुट्टी नंतर मुलं शाळेत परत आली कि लाईस चेकर्स येऊन सगळ्या मुलांचे केस तपासत असत. उवा आढळल्यास नर्स पलकांना फोन करीत असे.

एकदा आम्ही भारतात सुट्टी घालवून परत आल्यावर तपासणी नंतर शाळेच्या नर्सचा मला फोन आला. मी तिला भेटायला गेले. वाटलं तिला जरा समजावून सांगावं की उवा फारशा हानिकारक नसतात. त्यांच्या पासुन मुलांना इजा पोहचत नाही.  उत्साहानं तिला म्हंटल, "भारतात हे कॉमन आहे. सगळ्या शाळकरी मुलींच्या केसात कधी ना कधीतरी उवा होतातच. त्याच्या एखादया बहिणीकडुन त्याला हि भेट मिळाली असावी".

ती मोठी चूक झाली. नर्सच्या चेहऱ्यावर - फारच गलिच्छ लोक दिसतायत- अशा तऱ्हेचा भाव दिसला. धडपडत स्पष्टीकरण दयायचा प्रयत्न केला  - उष्ण प्रदेश आहे... घाम फार येतो…मुलींचे केस लांब असतात… तेल लावायची पद्धत आहे … वगैरे. काही फरक पडला नाही.

"उपाययोजना करावी लागेल… पुढच्या आठवड्यात पुन्हा तपासणी होईल… उ आढळली तर ती नाहीशी होईपर्यंत शाळेत येता येणार नाही". उवांच्या बाबतीत परिचारिकेची वृत्ती फारच संकुचित वाटली. उगिच शाळा बुडायला नको म्हणून मी शाळेनी आणलेल्या लाईस चेकर्सचा सल्ला घेतला. त्यांनी मला उवां विषयी काही माहिती पत्रकं दिली, शाम्पू / कंडीशनर सारखं काहीतरी लावायला दिलं आणि त्यांच्या पावती बरोबर (आभार प्रदर्शनार्थ?) उच्या चित्राची एक छान किचेन भेट म्हणून दिली. त्यांनी दिलेल्या खास उवांच्या शाम्पूच्या मुळाशी बडीशेप आहे कि काय अशी शंका यावी इतपत त्याचं बडीशेपेच्या वासाशी साधर्म्य होतं.

आजकाल कुठल्याही आजराची लस टोचणे फार प्रचलित झालय. पोलिओ, मेननजायटीस सारख्या गंभीर आजाराच्या लशींची गोष्ट वेगळी, पण आपल्याकडे ज्यांना बालपणात होणारे सर्वसामान्य आजार असं पूर्वी मानलं जायचं त्या गालगुंड, कांजिण्यांसाठीही मुलांना शाळा- प्रवेशाच्या आधी लस टोचायला लावतात. कम्पलसरी! लस नाही टोचली तर शाळा नाही.

मुलं वयात यायला लागल्यावर ती लवकरच शरीरसंबंध सुरु करतील असं गृहीत धरून त्यातुन जे रोग पसरण्याची शक्यता असते ते पसरू नयेत म्हणून मुलांना ती माध्यमिक शाळेत असतानाच एक नवीन लस टोचायला सुरुवात करावी असा मुलांचे डॉक्टर आजकाल आग्रह करतात. अजुन ती कम्पल्सरी नाही म्हणतात. पण हि लस टोचा, ती लस टोचा हे डॉक्टरांच्याकडून ऐकल कि संभ्रम वाढतो.

हिंवाळा तोंडावर आला कि फ्लू शॉट्सच्या जाहिराती सगळीकडे झळकायला लागतात. मुलांनी आणि वयस्करांनी ते टोचून घेणं चांगल असा भरपूर प्रचार केला जातो. औषधांच्या दुकानातही फ्लू शॉट्स घ्यायची सोय करतात. म्हणजे शाम्पू आणायला जाल तेंव्हाच फ्लूची लसही टोचून घेता येते. त्यातच स्वाईन फ्लू आला कि म्हणतात नेहमीच्या फ्लू बरोबर ह्या नवीन फ्लूची लसही टोचून घ्या. लशी तरी सारख्या किती टोचत बसायच्या? काळजी वाटते! उद्या म्हणतील शाम्पू घ्यायला आलाच आहात, तर जाता जाता हि उवांची लसही घ्या टोचुन म्हणजे उवांपासुन तुमच कायमच संरक्षण होईल.

Email us: yesheeandmommy@gmail.com


      

Wednesday, October 22, 2014

व्हेज x नॉन व्हेज

ठाण्याला रहात असताना आमच्या शेजारी एक शाकाहारी एकत्र कुटुंब रहायचं. खूप प्रेमळ माणसं. आमचा त्यांचा खूप घरोबा. शेजाऱ्यांच्या आडीअडचणीला ते नेहमी मदतीला धावून येत. अपार्टमेंट संस्कृती असली तरी आमच्या मजल्यावर सगळ्यांची दारं दिवसा उघडीच असायची. फक्त रात्री बंद व्हायची. माझ्या आईला लहान मुलांची फार आवड. शेजारची लहान मुलगी सतत तिच्याकडे असायची. पुढे ते दोन भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी रहायला गेले तरी जाणं -येणं कायम राहिलं.

पण त्या कुटुंबातील स्त्रिया आमच्याकडे पाणीही पीत नसत. आम्ही दादरला रहायला गेल्यावर दिवसभरासाठी म्हणून कधी घरी आल्या तरी उपास आहे म्हणून सांगत आणि काही ख्यायच -प्यायचं नाकारत. सुरुवातीला माझ्या ते लक्षात आलं नाही. वाटायचं खरच उपास असेल. पण असं बरेचदा घडल्यावर माझी ट्यूब पेटली. आईला त्यात काही विशेष वाटत नसे. पण मला ते खटकायला लागलं. माणसांच्या भावनांपेक्षा त्या त्यांच्या सोवळ्याला जास्त महत्व देतात असं वाटायला लागलं. मग मी हि त्यांच्या घरी खाणं बंद केलं.

मला वाटत ओबामांनीही तसच करावं. कधी गेलेच दिल्लीला आणि पंतप्रधानांच्या घरी बोलवलं जेवायला तर सरळ माझा उपास आहे म्हणून सांगायच आणि बरोबर आणलेलं आपलं उकळलेलं पाणी नाहीतर वाईन पीत बसायचं.

काही शाकाहारी लोक तर कमालच करतात. बाहेरचा पिझ्झा खातात पण मांसाहारी लोकांच्या घरातलं पाणी त्यांना चालत नाही. जणू काही पिझ्झा विकणारे सॉसेज आणि पेप्परोनी पिझ्झा वेगळ्या अव्हन मध्ये भाजतात आणि ह्यांच्या चीज पिझ्झासाठी वेगळी अव्हन वापरतात…एनी वे.

आजकाल बरीच मंडळी आरोग्यासाठी स्वखुशीन शाकाहारी होतेय. अमेरिकन रेस्तोरांत्स मध्येही व्हेज ऑप्शन्स असतात. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर मला काही शाकाहारी लोकांच्याबरोबर बाहेर जेवायला जायला आवडत नाही. फार बाऊ करतात काही लोकं त्यांच्या शाकाहाराचा - ह्या सॉस मध्ये मीट आहे का? त्यात अंड्याचा अंश आहे का? असं वेटरला विचारत नुसता कीस काढत बसतात - बरोबरची कंपनी किंवा जेवण एन्जॉय करणं राहिलं बाजूला. बोअर होतं!

जे पुढ्यात येईल ते चूपचाप खायचं अशी माझ्या वडिलांची शिकवण होती. प्रवासाला जाताना काहीहि  बांधून बरोबर घ्यायचं नाही. जे वाटेत मिळेल ते चालवून घायचं हा नियम होता. त्यामुळेच कदाचित खाण्यापिण्याच्या बाबतीतलि एवढी चिकित्सा मला मानवत नसावी.

माझ्या इथल्या काही मैत्रिणींकडे बघितल्यावर मला वाटायला लागलय कि त्यांचा शाकाहाराचा अट्टाहास हा कुठेतरी स्वतःला असर्ट करायचा प्रकार तर नसावा. जसं एखाद्या मुस्लिम कुटुंबात आई -आज्जी कोणीच बुरखा घालत नाहीत पण एखादी कॉलेज तरुणी अचानक बुरखा घालायला लागते. माझ्या एका मैत्रीणीचं थोडसं तसच आहे.

तिच्या सासूला, आईला मुंबईत, घरात नॉनव्हेज आणलेलं चालत. त्या स्वतः बनवत नाहीत पण बाहेरून आणून घरातल्यांनी खाल्ल तर त्यांची हरकत नसते. पण हि माझी मैत्रीण न्यूयॉर्कमध्ये नवऱ्याला घरातही काही आणू देत नाही आणि बाहेर जेवायला गेल्यावर तिच्या प्लेटला नॉनव्हेजचा चुकून नुसता स्पर्श झाला तरी प्लेट बदलायला लावते.

एकदा आम्ही रेस्तोरांत जेवत होतो. तीचा मोठा मुलगा आणि नवरा मासळीवर ताव मारत होते. मुलगा तर मासे इतक्या आवडीनं खातो जणू मागच्या जन्मी कोळी असावा. ती कसली तरी भाजी प्लेट मध्ये घेऊन धाकट्या मुलाला अंगावर पाजत बसली होती. त्याला पाजत पाजता मला म्हणाली, "ह्याला मी स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन करणार आहे".

मी सध्या माझा मूळचा स्पष्टवक्तेपणा कमी करायच्या प्रयत्नात आहे म्हणून सौम्यपणे तिला म्हंटल, "तो खूप लहान आहे. मोठा झाला कि ठरवेल काय खायचं, काय नाही खायचं ते".

माझ्या मैत्रिणी मला असलं काहीतरी का ऐकवतात ते समजत नाही. मागे एकदा एक गुजराथी मैत्रीण मला म्हणाली होती, "मी माझ्या मुलीला पक्की गुज्जू करणार आहे". तिचा नवरा महाराष्ट्रीयन आहे. मुलांना कुठली भारतीय भाषा शिकवायची ह्यावरून मला वाटत नवरा -बायकोत मतभेद असावेत. तर ती मला म्हणते, "मला मराठी गाणी ऐकायला आवडतात. पण बोललेली मराठी ऐकायला आवडत नाही. म्हणून मी मुलीला पक्की गुज्जू करणार. मुलगा मराठी झाला तरी चालेल".

त्यावेळी माझी स्पष्टवक्तेपणा निर्मुलन मोहिम सुरु झाली नव्हती म्हणून मी उगिचच माझं मतप्रदर्शन करत तिला म्हंटल, "मुलींचा ओढा वडिलांकडे जास्त असतो. तू जितकी तिला गुज्जू करायला बघशील तितकी ती मुद्दाम तुला चिडवायला मराठी होत जाईल. त्यापेक्षा तू मुलावर लक्ष केंद्रित कर. त्याला गुज्जू करणं बहुतेक तुला सोप्प पडेल".

त्यादिवशी रेस्तोरांत जर पूर्वीची मी असते तर मुलाला शाकाहारी करायला निघालेल्या मैत्रिणीला मनातलं सरळ सांगून टाकलं असतं - ' तू जर म्हणाली असतीस ना कि मी ह्याला मायकेल फेल्प्स सारखा स्विमर करणार किंवा रॉजर फेडरर सारखा टेनिस प्लेअर करणार तर मला तुझा हेवा वाटला असता. पण मुलाला शाकाहारी बनवायच हेच जर तुझं ध्येय असेल तर गुड लक. कर त्याला किती शाकाहारी करतेस ते'.