Sunday, September 14, 2014

नखरंग

त्यादिवशी मी खाली मान घालून रस्त्यानी चालले होते तेंव्हा अर्थातच मान खाली घालून चालताना जे दिसत ते मला दिसलं; म्हणून मी चालता- चालता अनौपचारिक पहाणी केली. त्यातून निष्कर्ष असा निघाला कि रस्त्यावरून चाललेल्या दर दहा बायकांच्यामध्ये एखाद -दुसरी स्त्रीच पायाची नखं न रंगवता घराबाहेर पडलेली असावी. म्हणजे आमच्या अप्पर वेस्ट साईडमध्ये किमान ७०-८० टक्के स्त्रिया (खरंच? एवढ्या?) सलॉन मध्ये जाऊन नखं रंगवून घेतात असं दिसतय.

पावला- पावलावर (!)  नेल सलॉन असूनही ती सतत भरलेली का असतात हे कोडं मला त्यादिवशी उलगडलं. नखं रंगवण हा इथे पर्सनल ग्रुमिंगचा इतका अविभाज्य भाग झालय हे तोपर्यंत माझ्या लक्षात आलं नव्हतं. जसं आपण केस विंचरल्या शिवाय, दात घासल्या शिवाय घराबाहेर पडणार नाही तसं काही बायका नखं रंगवल्या शिवाय घराबाहेर पडण अनुचित समजत असाव्यात.पूर्वी आपल्याकडे तळपाय हा शरीराचा सर्वात दुर्लक्षिलेला अवयव असायचा - म्हणजे वर -वर पहाता तरी. जे पुरुष बूट - मोजे घालून कामावर जायचे त्यांच्या तळपायांची स्थिती जरा बरी असेल पण बऱ्याच महिलांचे तळपाय बारा महिने धुळिनी काळवंडलेले, सुकलेले, मोठ्ठ्या भेगा पडलेले असायचे. स्वतःकडे दुर्लक्ष हे एकमेव कारण त्यामागे असावं. मग नखं रंगवण तर दूरंच राहिलं. लहानपणी केलेलं एक इंटरेस्टिंग निरीक्षण मला आठवतं  - कामवाल्या बायकांचे तळपाय त्या ज्यांच्या घरी कामं करायच्या त्या बायकांपेक्षा स्वच्छ असायचे. घरोघरीची धुणी धुताना त्यांच रोज साबणाच्या पाण्यात पेडीक्युअर होत असावं. ज्या गोष्टीसाठी मला आंघोळीतली एक-दोन मिनिटं आठवणीन बाजूला ठेवावी लागतात ते तिला अनायसे साध्य होतं म्हणून आमच्या कामाच्या बाईचा मला तेंव्हा हेवा वाटायचा.

नखं रंगवलेली स्वच्छ पावलं दिसतात छान हे कोणीही मान्य करील. त्यादिवशीच्या माझ्या पहाणीत असही दिसुन आलं कि बहुतेक स्त्रियांच्या नखांवर लाल चुट्टुक रंगाचं पॉलीश होतं. क्वचितच एखादीच निळसर - जो सध्या तरुणींमध्ये लोकप्रिय नख-रंग दिसतोय. सगळीच्या सगळी पावलं नाजूक सुंदर चप्पलांनी सजलेली होती. चप्पल हा ही आता दागिनाच झालाय जणू. सोनेरी- चंदेरी -खड्यांनी मढलेल्या-विविध प्रकारचे गोंडे लावलेल्या कित्ती सुंदर डिझाईनच्या असतात!
                       हा महिना संपत आला कि थंडी जशी वाढत जाईल तशी मोकळ्या हवेत फिरणारी सगळी पावलं हळूहळू काळ्या, ब्राऊन बुटात बंदिस्त होतं जातील. पण म्हणून ती सलॉनकडे वळायचं विसरतील असं नाही. पेडीक्युअर नाही तरी मेनिक्युअर साठी तरी त्यांना जावच लागेल.

मेनिक्युअरशी माझं फारसं सख्य नाही. माझ्या देशी स्वयंपाकघरातल्या सततच्या हात धुण्यात नखरंगाचा दुसऱ्या दिवशी कपचा उडतो. आणि त्यावर हळदीचे सुंदर पिवळे डागही पडतात ते वेगळच.  ग्लव्ज घालून स्वयंपाक कर -
नखं रंगवणाऱ्या चीनी मुली सल्ला देतात. पण रबरी हातानी कांदा चिरायची, कणिक मळायची सवय अजून लावून घ्यायचीय.

शिवाय, बुटांनी पावलं झाकली गेली म्हणून काय झालं? थंडीत चालून कुडकुडल्यावर थोडावेळ उबदार गुबगुबीत खुर्चीत जाऊन बसायला, कोणाकडून तरी कोमट पाण्यानी धुवून, चोळून, सुवासिक क्रीमनी थोडं आंजारून -गोंजारून घ्यायला कुठल्या पावलांना आवडणार नाही?