Saturday, August 17, 2013

NYC Photos at the End of Summer



Sunrise over the San Remo, Saturday, October 5, 2013.










Big Apple ring





Car parked on Broadway







Time Warner Centre










Columbus Circle was bustling with tourists last night.







Rowing in the Hudson



                                      








Thursday, June 27, 2013

मुंबईचं मनोगत

दोन दिवसांपूर्वी पहाटे मुंबई स्वप्नात आली. जरा नाराज होती. आल्या आल्या म्हणाली, "शोभा डेंनि माझ्याबद्दल काय लिहिलंय वाचलंस का?"

म्हंटल : नाही, का ग?

मुंबई : रोज तर तिचा ब्लॉग वाचतेस. आणि एवढ महत्वाच नाही वाचलस?

मी : तुझा उल्लेख पाहिला मी एका पोस्ट मध्ये. पण मला वाटलं तिनं तुर्कस्तानबद्दल काहीतरी लिहिलय. म्हणून वरवर चाळलं नुसत. लक्षपूर्वक नाही वाचलं. तुझ्याबद्दल काय लिहिलय?

मुंबई : ती म्हणते कि मोठे बिल्डर आणि राजकारणी मिळून माझी सगळी जमीन घशात घालायच्या मागे आहेत. आज ते महालक्ष्मी रेसकोर्स गिळंकृत करायला बघतायत. उद्या हंगिंग गार्डन्सच्या मागे लागतील. आणि मुंबईकर नुसते बघत
बसलेत. तुर्की सरकार जेंव्हा इस्तंबुलमधल्या ६० एकराच्या गेझी पार्कवर शॉपिंग मॉल बांधायला निघालं तेंव्हा तिथली सामान्य जनता म्हणे सरकार विरुद्ध खवळून उठली. आणि आपल्याकडे मात्र नुसती टीव्हीवर चर्चा करायची आणि पेपरात पत्र लिहायची ह्यापलीकडे लोकं काही करायलाच तयार नाहीत. त्यांच्यात काही जोशच उरलेला नाही.

मी : जोश नाही कसं म्हणतेस. मागे दिल्लीत त्या मुलीवर बलात्कार झाला तर तरुण पिढी खवळून उठलीच कि.
जागोजागी निदर्शनं झाली. शिवाजी पार्कलाही बघितली मी तरुण मुलांची निदर्शनं.

मुंबई : मी नाही म्हणत ग ती डेबाईच म्हणतेय. पण माझ्याच बाबतीत एवढी उदासीनता का? बिल्डरलोकांना तर पैशाशिवाय कशाचीच पर्वा नाही. गुंड/राजकारणी त्यांना सामील. जुन्या ऐतिहासिक वास्तू, थोडीफार काही वनराई उरली होती ती त्यांनी आधीच उध्वस्त केलीय. आणि मुंबईकर घाबरून गप्प बसलेत.

"घाबरून नसेल." मी पुटपुटले. "मला वाटत काय झालय माहिती आहे का, जेन्ट्रीफिकेशनमुळे तुझ्या काही भागातून तुझे मूळचे मुंबईकर हद्दपार झालेत. आणि तिथे नवीन आलेल्या श्रीमंतीमुळे त्यांना तुझ्यातुन मार्जिनलाईझ झाल्यासारख वाटतय बघ."

मुंबई : होक्का. काय बडबडतेस. जेन्ट्रीफिकेशन काय. मार्जिनलाईझ काय. न्यूयॉर्कला गेल्यापासून तुझं शब्दभांडार बरंच वाढलेलं दिसतय.

मी : जाऊ दे. उगाच जरा मोठे शब्द वापरायचा चान्स घेतला. मला काय म्हणायचय कि तुझ्या काही भागातल्या श्रीमंतीच मूळच्या साध्या-सुध्या मुंबईकरांवर दडपण येतं. तुझी सूत्र आपल्या हातात घेण्याइतपत आत्मविश्वास नाही त्यांच्यात.

मुंबई : मग त्यात माझी काय चूक? मी किती सहन करायचं? मागे काही मंडळी माझं शांघाय आणि सिंगापूर करायला निघाली होती. ते जेंव्हा होईल तेंव्हा काय होईल माझ्या ह्या "साध्या-सुध्या मुंबईकरांच". आणखी किती लांब पळतील ते माझ्या पासून. मला सांग उद्या जर कोणी तुला म्हंटल कि आपण तुझी अंजेलिना जोली करूया तर तुला कसं वाटेल.

मी गप्प बसले. मनात आलं, मला जर कोणी अंजेलिना जोली करू शकत असेल तर आणखी काय पाहिजे. पण मुंबई जोक ऐकायच्या मूड मध्ये नव्हती. तिला दिलासा द्यायला मी म्हंटल,

"तुझं शांघाय - सिंगापूर व्हायची काळजी तू नको करूस. अग ठसठशीत मराठी सौंदर्य तुझं. ते कसं लोपेल. पण मी आपलं माझ्या अनुभवावरून तुला सांगते. आता बघ मी न्यूयॉर्कमध्ये रहाते. खूप सुंदर शहर आहे हे. रुंद रस्ते आणि फुटपाथ, शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्ठे पब्लिक पार्क्स, बिन-गर्दीच्या ट्रेन्स आणि बसेस. असं वाटतं कि कोणतरी झटतय इथे रहाणाऱ्या लोकांना आणि येणाऱ्या पर्यटकांना खूष ठेवण्यासाठी. पण तरीही मला तुझ्याबद्दल जेवढ प्रेम वाटत ते ह्या शहराबद्दल कसं वाटणार?

तसंच काहीसं तुझ्याकडे येणाऱ्या लोकांच होत असेल ग. नोकरी-धंद्या निमित्त बाहेरगावाहून जे येतात त्यांचा उद्देश काय असतो- दोन बेडरूमच्या घरातून तीन बेडरुमच्या घरात कसं जायचं. आणि दुसऱ्या मजल्यावरून दहाव्या मजल्यावर रहायला कधी जायचं. मी बघते ना माझ्या प्रभादेवीतल्या शेजाऱ्यांच. सुट्टीत परदेश सहली करायच्या. एरवीही काय घरातून गाडीत बसायचं. गाडीतून - ऑफिसात, हॉटेलात, शॉपिंग मॉलमध्ये आणि विमानतळवर. त्यांना कुठे ग तुझी काळजी करण्यात इंटरेस्ट. त्यांना तर तुझी भाषाही बोलता येत नाही. आणि तुझे मूळ मुंबईकर जे दूर कुठल्यातरी उपनगरात ढकलले गेलेत ते कामावरून सुटल्यावर लोकलचा प्रवास करून इतके थकून भागून घरी येत असतील कि टीव्ही बघण्याशिवाय इतर काही करायच त्राणच त्यांच्यात उरत नसेल. म्हणून तुला वाटतय कि तुला कोणी वाली उरलेला नाही."

मुंबई : मला आशेचा किरण दाखवायचं सोडून तू तर…

गजर झाला तशी गेली बिचारी. माझा दिवस सुरु झाला तशी तिची रात्र.








Friday, June 14, 2013

Riverside Park

Beautiful Riverside Park this morning with George Washington Bridge in the background. 










Saturday, May 18, 2013

Midnight Chase





Yeshee performing Midnight Chase by Christopher Goldston in the End of the Year piano-class recital at the school yesterday.



Tuesday, May 14, 2013

Poems Enjoyed in Junior School

Two collections of light verse (funny poems) that Yeshee and I enjoyed reading in Junior School are Laugh-eteria by Douglas Florian and Soup for Breakfast. (The following poems are not from those collections):









Wednesday, May 8, 2013

माझी गुलाबी पर्स

मागच्या आठवड्यात माझी पैशाची पर्स हरवली. म्हणजे हरवली असं नाही म्हणता येणार खरतर विसरली गेलि.  झालं काय कि मुलाची स्कूल बस 70th street आणि Broadway च्या कोपऱ्यावर थांबते. त्या कोपऱ्यावर एक वर्तमानपत्र, मासिकं, गोळ्या, चिप्स विकायचा stand आहे; मुंबईत कोपऱ्या-कोपऱ्यावर अंडी, ब्रेड, बिस्किटं विकणारे असतात ना त्या प्रकारचा. त्याच्या शेजारी न्यूयॉर्क टाईम्सचा एक मोठ्ठा नीळा पत्र्याचा बॉक्स आहे. बसला ट्राफिकमध्ये उशीर झाला तर बुड टेकायला तो उपयोगी पडतो. मागच्या गुरुवारी मुलगा बसमधून उतरला आणि म्हणाला, "मी शेजारच्या दुकानातून गोळ्या घेतो म्हणजे मला मित्रांच्या बरोबर त्या खाता येतिल".  त्याचे मित्र आपल्या आईबरोबर आम्हाला बस stop वर भेटणार होते आणि मग त्यांच्याबरोबर प्ले ग्राउंडवर खेळायला जायचा बेत होता.

बऱ्याच महिन्यांनी हि प्ले-डेट बाहेर ग्राउंडवर होत होती. गेले काही महिने थंडीमुळे मुलांना बिल्डींगच्या जीममध्येच खेळावं  लागलं होतं. त्याला त्यांची काहीच तक्रार नसते. त्यांना उलट जीमच आवडते. कारण तिथे बास्केट-बॉल, टेबल- टेनिस काय हवं ते खेळता येतं. पण आम्हाला आयांनाच असं वाटत कि सारख बंद जीममधल्या हीट- एसी मध्ये खेळण्यापेक्षा, थंडी नसेल तेंव्हा त्यांनी उघड्यावर मोकळ्या हवेत खेळावं.
                                           
                                                                  70th Street


    ब्रॉडवे आणि ७० स्ट्रीटच इंटरसेक्शन आणि उजव्या हाताला खाली कोपऱ्यात पब्लिक स्कूलच (PS 199) प्ले ग्राउंड


मुलाच्या गोळ्या घेऊन झाल्या तरी त्याच्या मित्रांचा पत्ता नव्हता.  बास्केट-बॉल खेळायच तर बॉलहि नव्हता. म्हणून मी त्यांच्या आईला टेक्स्ट केलं कि 'आम्ही बॉल घेऊन येतो. तुम्ही प्ले ग्राउंड वर थांबा'. 70th स्ट्रीट पासून आम्ही 72nd स्ट्रीटपर्यंत चालत गेलो. रस्ता क्रॉसकरून उजवीकडे वळल्यावर जवळ जवळ अर्धा ब्लॉक अंतरावर एक खेळण्यांच दुकान आहे. तिकडे बॉल निवडण्यात थोडा वेळ गेला. कॅशिअरच्या पुढ्यात थोडी लाईन होती म्हणून थांबावं लागलं. पैसे दयायला म्हणून मी मोठी पर्स उघडलि तेंव्हा लक्षात आलं कि आतलं पैशाच गुलाबी पाकीट गायब होतं.

मुलाला म्हंटल, "मगाशी मी घरी बहुतेक कशालातरी पाकीट काढलं असणार, ते घरीच राहिलं". मुलगा म्हणतो, "नाही, मी तुला दिलं होतं". म्हंटल, "कधी दिलं होतस?" तर म्हणाला, "मी गोळ्या घ्यायला म्हणून पैसे काढले आणि पाकीट तुला परत दिलं".

मी त्याच्या मित्रांची वाट बघण्यात, त्यांच्या आईला फोन/टेक्स्ट करण्यात इतकी मग्न होते कि मी त्याच्या हातातले पैसे बघितले पण त्यानं ते पाकीट काढलं कधी आणि ते कुठे ठेवलं ते काहीच मी बघितलं नाही. मला वाटलं  मोठ्या पर्सच्या आतल्या कप्प्यात त्याला सुट्टे पैसे सापडले असतील.

लोकांच्यासमोर मी मुलावर ओरडत नाही. पण त्यादिवशी नकळत त्या दुकानातच माझा आवाज चढला. तिथली कॅशियर आणि रांगेत उभ्या असलेल्या दुसऱ्या बाईला ते ऑकवर्ड वाटतय हे हि मला दिसत होतं तरीही माझा आवाज खाली येईना. नशीब बॉलपुरते पैसे मोठ्या पर्स मध्ये होते. ते देऊन, सुटे पैसे परत घेऊन, मुलावर ओरडतच मी दुकानातून बाहेर पडले आणि त्याला म्हंटल, "जा आता धावत पळत आणि बघ ते पाकीट त्या निळ्या पेटीवर आहे का".  तो धावत सुटला तशी पाकीट हरवल्याचा आता किती व्याप होणार ह्याची मी मनातल्या मनात उजळणी करत होते.  चेक बुक पाकिटात होतं म्हणजे ते कॅन्सल करावं लागणार. काही ID कार्डस होती ती कॅन्सल करून नवीनसाठी अप्लाय करावं लागणार.

सत्तर- बहात्तर स्ट्रीट आणि ब्रॉडवे हा Manhattanचा इतका गजबजलेला भाग आहे कि भर गर्दीच्यावेळी असं उघड्यावर पडलेलं पाकीट वीस-पंचवीस मिनिटांनंतर तिथे परत मिळू शकणार नाही ह्याची मला खात्री होती. दहा वर्षांपूर्वी रिव्हरसाईड ड्राईव्हवर नाही मिळालं तर ब्रॉडवेवर काय मिळणार.

दहा-बारावर्षांपूर्वी आम्ही 74th street आणि रिव्हरसाईड ड्राईव्हच्या कोपऱ्यावर रहात होतो. ब्रॉडवेपासून दोन ब्लॉकच्या अंतरावर असूनही ब्रॉडवेच्यामनाने हा रस्ता दिवसाच्या कुठल्याही वेळी खूपच शांत असतो. नावाप्रमाणेच नदीच्या बाजूनी जाणारा. फॉल आणि विन्टर मध्ये ह्या रस्त्यावर कधीकधी इतका वारा असतो कि आपला तोल संभाळण कठीण होतं. एकदा सकाळी मी घराबाहेर पडले आणि कोट- तोल सांभाळत, वाऱ्याला तोंड देत जेमतेम काही पावलं चालले असेन…तर लगेच लक्षात आलं कि खांद्याला लावलेली पर्सच गायब झालीय. तेंव्हा माझ्याकडे एक चामड्याची चंची होती - खूप वर्षांपूर्वी गोव्याला एका छोट्याशा दुकानात घेतलेली. तिची पाठीमागची बाजू प्लेन काळ्या चामड्याची होती, पुढच्या बाजूला राजस्थानी मिररवर्कच भरतकाम केलेलं ब्राऊन रंगाच कापड होतं आणि खांद्याला अडकवायला नाजूक काळा गोफ होता. खूप सुंदर पर्स होती. हुबेहुब चंचीच्याच आकाराची. फारसं काही सामान रहात नसे तीच्यात. पण त्यादिवशी मला फक्त चेकबुक घेऊनच कुठेतरी जायचं होतं म्हणून ती पर्स घेतली. पर्स गायब झाल्याच लक्षात आल्यावर लगेच मी चार-पाच ब्लॉकचा परिसर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत धुंडाळला. रस्ता तर निर्मनुष्य होता. जवळपास चीटपाखरुही दिसत नव्हत. फॉलचे दिवस असल्यामुळे पालापाचोळा तेवढा जिकडे तिकडे उडत होता. त्या पालापाचोळ्या बरोबर लांब कुठे उडून गेली कि काय कुणास ठाऊक. पण ती पर्स काही सापडली नाही.


उजव्या हाताला खालच्या कोपऱ्यात रिव्हर साईड ड्राईव्हचा  74th स्ट्रीट  जवळचा भाग . 

तो अनुभव आठवतच मी 72nd street क्रॉस करून बस stop कडे चालले होते तर समोरून मुलगा माझ्या दिशेने पळत येताना दिसला… त्याच्या हातात माझी गुलाबी पर्स! दहा वर्षात न्यूयॉर्कर्सच्या प्रामाणिकपणात वाढ झाली कि काय असं वाटून गेलं. तर मैत्रीण म्हणाली, "तसं काही नसणार. पण आजकाल वाढत्या टेररीस्ट हल्ल्यांमुळे गजबजलेल्या भागात भरपूर कॅमेरे लावलेले असतात (बॉस्टन मारेथोन मधले बॉम्ब हल्ले नुकतेच झाले होते).  हे कारण असेल कदाचित नाहीतर उगीच पर्समध्ये बॉम्ब -बिंब असला तर… हि भीती असेल. म्हणून कोणी पर्सला हात लावला नसेल".

किंवा कदाचित त्या गुलाबी पर्सला मला सोडून कुठे जायचं नसेल!

एकदा मुंबईतही मी ते पाकीट एका पेपरवाल्याकडे विसरले होते. कीर्ती कॉलेजच्या बाहेर जी वडापाववाल्याची गल्ली आहे त्या गल्लीतून बाहेर येउन कॅडल रोड क्रॉस केला कि पलीकडच्या बाजूला, डाव्या हाताला कोपऱ्यावर एक पेपरवाले बसतात. आज कित्तीतरी वर्ष तो newstand तिथे आहे. मीच गेली वीस- पंचवीस वर्ष तिथुन पेपर घेतेय. दोन वर्षांपूर्वी एका  संध्याकाळी मी पेपर-मासिकं घेऊन पैसे दिले आणि पाकीट तिथेच विसरले. पावसाळ्याचे दिवस होते म्हणून पेपरवर प्लास्टिक घातलेलं होतं त्याखाली बहुतेक माझं पाकीट गाडलं गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आलं. मासिकं घेतल्यावर मी दुसरीकडे कुठेच गेले नव्हते त्यामुळे पाकीट कुठे राहिलं असेल ते आठवणं कठीण गेलं नहि. तसंच दुसऱ्या कुणीतरी उचलायच्या आधी पेपरवाल्या भाऊंना ते सापडलं तर त्यांनी ते ठेवलं असणार ह्याचीही मला खात्री होती. आणि झालही तसच. मी विचारायला गेले तर ते भाऊ नव्हते. एक ताई होत्या. त्यांना विचारलं, "रात्री इथे पाकीट सापडलं का?" तर त्या म्हणाल्या, "थांबा फोन करून विचारते".  आणि त्यांनी फोन केल्यावर मिनिटा-दोन मिनिटातच आले आपले कालचेच भाऊ माझं पाकीट घेऊन.














Friday, February 22, 2013

आप कतार में हैं ?

वीस - पंचवीस वर्षांपूर्वी मुंबईत आजच्या इतक्या टेलीफोन कंपन्या नव्हत्या. एकुलती एक MTNL होती आणि त्यांनी रेकॉर्डेड मेसेजची सेवा नुकतीच सुरु केली होती.

एकदा माझ्या आईनं कोणाला तरी फोन केला तर पलीकडून एका बाईचा आवाज आला, "आप कतार में है."  मम्मी गोंधळली. मोठ्या संकटांसमोर ती डगमगत नसे पण एखादया लहानशा गोष्टींनी उगीच घाबरुन जायची तिला सवय होती. तसं तिनं थोडं घाबरूनही घेतलं.

माझे वडील कामानिमित्त काही वर्ष कतार ह्या आखाती देशातल्या दोहा शहरात रहात होते. आम्ही सगळेजण नुकतेच तिकडे जाऊन आलो होत.  मम्मीला वाटलं, मी तर कतारहून केंव्हाच परत आले आणि नुसता इथल्या इथे दादर टी टीला मावशीला फोन लावला तर हि बाई मला अस का म्हणतेय कि आप कतार में है.

"कृपया प्रतीक्षा किजिये" हे त्या मेसेज मधलं पुढचं वाक्य ऐकल्यावर सगळा  खुलासा झाला.

हि आठवण सांगायचा हेतू हा कि टेलिफोन कंपनीनं जबरदस्ती आपल्याला व्हर्च्युअल लाईनीत उभं केलं तर आपण ते नाईलाजास्तव चालवून घेतो, नाहीतर एरवी लाईनीत उभं राहून आपला नंबर लागायची वाट बघण्यापेक्षा लाईन मोडून पुढे घुसणे किंवा कुठल्याही काउंटर भोवती कोंडाळ करून उभे रहाणे ह्याकडेच आपला कल जास्त.

भारतीयांना लाईन लावायच एवढ वावडं का ह्यावर सध्या मी विचार करतेय. आणि त्यातून मी अशा प्राथमिक निष्कर्षापर्यंत पोहोचलेय कि एक कारण कदाचित असं असू शकेल कि पूर्वी आपल्याकडे सगळ्या गोष्टींची टंचाई असायची- मधूनच साखर दुकानातून गडप व्हायची नाहीतर रॉकेल गायब व्हायचं. लाईनीत मागे नंबर असेल तर आपला नंबर लागे पर्यन्त सगळं संपेल आणि आपल्याला रिकामी हातानी घरी परतावं लागेल ह्या भीतीपोटी तर आपल्याला लाईन मोडायची सवय लागली नसेल. आणि एकदा लागलेल्या सवयी सहजासहजी थोड्याच सुटतात.

मी असं ऐकलय कि जपान हा फार शिस्तप्रिय देश आहे. त्या देशात सरकारनी एखादा नियम केला कि तो मोडायचं जपानी नागरिकांच्या स्वप्नातही येत नाही.  म्हणजे ' येथे कचरा टाकू नये' ह्या पाटीखाली कचऱ्याचा ढीग करून ठेवणे, 'येथे थुंकू नये' असं लिहिलं असेल तिथेच थुंकून ठेवणे असले उद्योग जपानी लोक करत नसावेत.

काही वर्षांपूर्वी माझ्या मुलाच्या वर्गात एक जपानी मुलगा होता. शाळा सुटली कि घरी जाताना तो आणि त्याची आई आणि मी आणि माझा मुलगा एकाच बस/ ट्रेन मध्ये असायचो.  इथे सगळ्या सीटी बसेसमध्ये अधूनमधून अनाउन्समेंट चालू असते कि बसमधून उतरताना मागच्या दरवाजांनी उतरा (म्हणजे पुढचा दरवाजा चढणाऱ्या लोकांसाठी मोकळा रहिल). बहुतेक लोकं त्या सुचनेकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात आणि जो जवळ असेल त्या दरवाजानी उतरतात. पण युमिको- ती जपानी आई मात्र दररोज न चुकता त्या सूचनेच तंतोतंत पालन करायची. ती अगदी पुढे, पुढच्या दरवाजाच्या जवळ उभी असो, मागे बस खचाखच भरलेली असो, ती त्या गर्दीतून वाट काढत मागे जाऊन, मागच्या दरवाजांनीच खाली उतरायची.

एकदा आमची मुलं बर्थ डे पार्टीला गेली होती. पार्टी संपल्यावर ती आणी मी बरोबरच मुलांना घेऊन बाहेर पडलो. सबवेच स्टेशन अगदी समोरच, रस्त्याच्या पलीकडे होतं. रस्ता एकदम रिकामी होता. रविवारची सकाळची वेळ होती. जवळपास एकही गाडी दिसत नव्हती. मी मुलाला घेऊन पटकन रस्ता क्रोस केला. मला वाटलं युमिकोनही केला असेल.
बघते तर ती लांब कोपऱ्यावर असलेल्या सिग्नलकडे जाऊन उभी होती. रस्ता रिकामा असूनही ती सिग्नल हिरवा होई पर्यंत थांबली. आणि हिरवा सिग्नल झाल्यावरच तिनं झीब्रा क्रॉसिंग वर रस्ता क्रॉस केला.

न्यूयॉर्कर्स रस्ता क्रॉस करणाच्या बाबतीत जपानी लोकांइतके काटेकोर नसतील पण लाईनीत उभं रहाण्याच्या  बाबतीत असतात. किबहुना लाईनची शिस्त पाळणं / लोकांना पाळायला लावण हे दैनंदिन आयुष्य सोप्प, स्ट्रेस-फ्री, होण्यासाठी आवश्यक आहे असं इथल्या लोकांना वाटत असावं.  नाहीतर एअरपोर्टवर किंवा सुपरमार्केटमध्ये रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास माणसं का नेमत असावेत.

न्यूयॉर्कमध्ये तुम्ही व्होल फुड्स किंवा फ़ेअरवे सारख्या मोठ्या सुपरमार्केटमध्ये जा, गर्दिची वेळ असो नसो, लाईनच्या तोंडाशी कोण ना कोणतरी उभं असतं, तुम्ही कुठच्या लाईनीत किंवा किती नंबरच्या कॅशिअरकडे जायचं ते सांगायला.  काही ठिकाणी नंबर दिले जातात. तुमचा नंबर पुकारला गेल्यावर तुम्ही काउंटरकडे जाऊन आपली ऑर्डर देऊ शकता.

त्याउलट आपल्याकडे सणाच्या दिवशी मिठाईच्या दुकानात खरतर किती गर्दी असते. पण तरीही लोकांनी एका लाईनीत उभं रहावं ह्या दृष्टिन कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही.  गिऱ्हाईकं काउंटर समोर गर्दी करून उभी असतात आणि आपल्याला एक किलो श्रीखंड हवं कि अर्धा किलो बासुंदी हे ओरडून काउंटर पलीकडच्या माणसाला सांगत असतात. ज्याचा आवाज मोठा त्याचं पार्सल अर्थातच आधी तयार होतं. त्यातून आपल्याला अर्धा किलो शुगर- फ्री बासुंदी हवीय हे सगळ्या गर्दीसमोर ओरडून सांगायला तुम्हाला संकोच वाटत असेल तर तुमच्या कितीतरी नंतर आलेले, नि:संकोच ओरडू शकणारे लोक आपली ऑर्डर घेऊन परत जातायत हे बघत तुम्हाला तिथे उभं राहावं लागतं.

तीच गोष्ट एअरपोर्टची. न्यूयॉर्कला तुमची फ्लाईट भल्या पहाटे जरी आली, आणि एअरपोर्ट रिकामा असेल, तुमच्या खेरीज दुसरी कुठलीही फ्लाईट त्यावेळी आली नसेल, इमिग्रेशनसाठी बिलकुल लाईन नसेल, तरीहि तिथले कर्मचारी  तुम्ही कुठल्या काउंटरकडे जायचं ते सांगायला तिथे हजर असतात.

याउलट आपल्या एअरपोर्टवर सगळा आनंदच असतो.  मागच्यावेळी मी मुंबईला गेले तर दोन -तीन फ्लाईट एकदम आल्या होत्या. आणि सामान स्कॅन करणारं एकच मशीन चालु होतं. अर्थातच कस्टम्स क्लिअरन्ससाठी त्या मशीन समोर भरपूर लांब लाईन लागली. तेवढ्यात एक सूट -बूटधारी, परदेश प्रवास करून आलेले महाशय आले, लाईनच्या अगदी पुढे गेले आणि त्या लाईनला त्यांनी आपलं स्वतःच एक नवीनच शेपूट जोडलं.

मूळ लाईनीच्या शेवटी एक माणूस होता, तो पूढे आला आणि त्यांना म्हणाला - सर, लाईनचा शेवट खूप पाठीमागे आहे. तुम्ही चुकीच्या जागी उभे आहात.  प्लीज, मागे लाईनीत उभे रहा. तर ते महाशय त्या माणसाला म्हणतात, मला नाही माहिती तुम्ही कुठल्या लाईनीत उभे आहात. माझी लाईन तर हि इथेच आहे.  मग त्या मूळ लाईनला आणखी दोन -तीन शेपट फुटली. आणि तीहि वाढत गेली.

अशा प्रकारचा उद्दामपणा जो आपल्याकडे बराच बघायला मिळतो- आपल्या सार्वजनिक आयुष्यात आणि कधीकधी आपल्या पारिवारिक संबंधातही-  मी इतक्या वर्षात न्यूयॉर्कमध्ये कधी नाही बघितला. न्यूयॉर्कमधेही क्वचित कधीतरी, एखादं कोणतरी लाईन आहे कि नाही ते न बघता पुढे जाताना दिसतं. पण तुम्ही त्यांना हटकलं आणि लाईनीत या म्हंटल, तर ते तुमचं ऐकतील आणि मागे जाऊन उभे रहातील. कोणी नको म्हंटल तर मुद्दाम ती गोष्ट करायची, कोणी आपली चूक दाखवून दिली तरी ती मान्य न करता आपलच घोडं पुढे दामटत बसायचं हे मला वाटत गरीब, अशिक्षित समाजाचं द्योतक असावं.

बरं मुंबईच्या विमानतळावर आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची विजार असा गणवेश घातलेले अनेक लोक जागोजागी घोळक्यानी गप्पा छाटत उभे असतात. त्यांना कुठल्या कामासाठी तिथे नेमलेलं असतं हे तो छत्रपति शिवाजी विमानतळच जाणे. मधूनच ते तुमच्या जवळ येऊन हळूच तुम्हाला सामानासाठी काही मदत हवी आहे का असं विचारतात. पण गर्दीच्यावेळीही त्यातले सगळेच काम करतायत असं तर कधी दिसत नाही. त्यातल्या काहींना लाईनचं  नियंत्रण करण्याच काम का देत नाहीत कुणास ठाऊक. सांगायचा मुद्दा हा कि माणसांची कमतरता तर आपल्याकडे निश्चीतच नाही.

नियम मोडायचे किंवा त्यातून पळवाट शोधत बसायची हे आपल्याकडे किती रुटीन झालाय ह्याच दुसरं एक उदाहरण मला विमानतळावर बघायला मिळालं. न्यूयॉर्कला परत येताना मी इमिग्रेशनसाठी उभी होते. फर्स्ट क्लासच्या लाईनीत एक माणूस येऊन उभा राहिला. त्यानं आपल्या पुढे दुसऱ्या एका माणसाला उभं केलं. जेंव्हा त्या पुढच्या माणसाचा नंबर लागला तेंव्हा त्याचं तिकीट बघून इमिग्रेशन ऑफिसर त्याला म्हणाला, तुझं तिकिट इकोनॉमी क्लासचं आहे. तू त्या लाईनीत जा. तर तो मागे उभा असलेला माणूस अतिशय गुर्मीत, तुच्छतेनं त्या ऑफिसरला म्हणतो, आम्ही दोघं  बरोबर आहोत म्हणून तो ह्या लाईनीत आलाय. बिचारा इमिग्रेशन ऑफिसर त्या माणसाच्या मगरुरीला घाबरला असावा त्यानं त्या पहिल्या माणसाला आत जाऊ दिलं. जेंव्हा ह्या मागच्या माणसाची टर्न आली, तेंव्हा त्याचं तिकीट बघितल्यावर तो ऑफिसर त्याला  म्हणाला, तू एका ठिकाणी चाललायस, तो दुसरीकडे कुठेतरी चाललाय, तुम्ही दोघं एका कुटुंबातलेहि नाही आणि तू मला सांगतोस आम्ही दोघं बरोबर आहोत.  पण ते ऐकल्यावरही त्या माणसाला, आपण सगळ्या लोकांसमोर चक्क खोटं बोललो, ह्याबद्दल ना खंत, ना खेद, ना लाज, लज्जा, शरम. त्याची गुर्मी तशीच कायम. उपकार केल्यासारखं तो त्या ऑफिसरला थातूर मातुर सॉरी म्हणाला. ऑफिसरनहि त्याच्या मगरुरीपुढे काही करायला आपण असहाय, असमर्थ असल्यासारखं त्यालाही आत जाऊ दिलं.

मी शेजारी उभी राहून सगळ बघत होते. वाटलं हे सगळ कशासाठी. केवळ आपल्या कोणालातरी इकोनॉमी क्लासच्या लांब लाईनीत उभं राहायला लागू नये म्हणून.

असले प्रकार आपल्याकडे पावलोपावली बघायला मिळतात.  विमानतळावरचे परदेश प्रवास केलेले, इंग्लिश बोलू शकणारे लोक चार इयत्ता शिकलेले असतील, गरीब नसतील म्हणून ते वेगळं वागतील हा समज चुकीचा आहे.  तसच भारतीय लोक भारतात कसेही वागोत परदेशी गेले कि तिथले नियम चुपचाप पाळतात हि समजूतही साफ खोटी आहे. नायाग्रा  फोल्सच्या लाईनीत तरुण, शिकलेली दिसणारी देशी कंपनी, अमेरिका बघायला आलेल्या आपल्या आईवडिलांसकट पुढे घुसताना मी बघितलय.

थोडक्यात काय रांग अमेरिकेत नायाग्राच्या दर्शनासाठी असो नाहीतर शिरडीत साईबाबांच्या, मंडळी शोर्टस/ जीन्स मधली असो नाहीतर लुगडं/ धोतरातली, लाईनीत पुढे घुसणे हा आमचा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच ह्या तालावर देशी कंपनीचं आगे बढो चालू असतं.

साईबाबांच्या दर्शनाला आजकाल लांब लाईन असते हे मला माहित नव्हतं. काही वर्षांपूर्वी आम्ही गेलो तर पटकन  दर्शन झालं होतं. ह्यावेळी मात्र लांबच्या लांब रांगेत उभं राहावं लागलं. खोली क्रमांक चार मधून खोली क्रमांक तीन मग दोन अशी हळू हळू रांग पुढे सरकत होति. मंडळी आपआपल्यापरीनं पूढे घुसत होती. दीड -दोन तास रांगेत उभं राहिल्यावर आम्ही शेवटच्या टप्प्यावर येउन पोहोचलो. मंडपात पोहोचल्यावर सगळे साईबाबांच्या दर्शनाने भारावले असावेत. रांग शांतपणे पुढे सरकू लागली. घुसखोरीही थांबली. इतक्यात खेडवळ दिसणाऱ्या मंडळींचा एक घोळका आपापसात धक्काबुक्की करत मागून पुढे गेला आणि थेट मुर्तीपाशी जाऊन दर्शनासाठी आपसातच चेंगराचेंगरी करू लागला. मूर्तीजवळ गोंधळ माजला तेंव्हा सिक्युरिटी गार्डसनि त्यांना घाईत बाहेर काढलं. मला ते बघून वाईट वाटलं, कि त्यांना नीट दर्शन घेत आलं नाही. थोडा संयम दाखवला असता, शांतपणे रांगेत थांबले असते तर त्यांना व्यवस्थित, जास्तवेळ दर्शन मिळालं असतं. त्यांचा नंबर लागतच होता. आमच्या फार मागे नव्हते ते लोक.  दर्शन इतकं जवळ आल्यावर शेवटच्या क्षणी त्यांनी अशी घाई गडबड का केली मला समजलं नाही.

देव-दर्शनाच्या रांगेत पुढे घुसणाऱ्या भक्तांच मला नेहमी आश्चर्यं वाटतं. त्यानां काळजी नाही वाटत कि देव त्यांना पुढे घुसताना बघेल आणि थोडे कमी आशीर्वाद देईल. जे लोक लहान मुलाबाळांना घेऊन उन्हातान्हात तापत आपला नंबर लागायची वाट पहात थांबलेत त्यांना जास्त पूण्य लाभेल. का देवाच्या दरबारात सगळे गुन्हे माफ असतात, आणि देव आशीर्वाद देताना कुठलाच भेदभाव करत नाही अशी त्या घुसखोरांची गाढ श्रद्धा असते.

ग्लोबलायझेशनमुळे  मला लाईन ह्या विषयावर तुलनात्मक अभ्यास करायची संधी मिळाली.  न्यूयॉर्कमध्ये माझ्या घराजवळ सबवे सन्डवीचच दुकान आहे आणि मुंबईतही घराजवळ एक सबवेच दुकान आहे. न्यूयॉर्कच्या सबवेत काउंटरपलीकडे सगळे बांगलादेशी लोक असतात तर मुबईत तरुण मराठी मुलं असतात.

मला वाटलं कंपनी एकच असल्यामुळे काम करणाऱ्या लोकांच ट्रेनिंगहि सारखच असेल. न्यूयॉर्कमध्ये एका गिऱ्हाईकाची ऑर्डर पूर्ण झाली कि काउंटरपलीकडचा माणूस नेक्स्ट म्हणून पुकरतो. मग ज्याचा नंबर असेल त्यानं  पुढे होऊन आपली ऑर्डर द्यायची. प्रभादेवीच्या सबवेत मी गेले तर माझ्यापुढे एक बाई होती. मी वाट पाहत थांबले कि तीचं झाल कि ऑर्डर घेणारा मुलगा नेक्स्ट म्हणेल. तर तो मागे वळून आपल्या मित्रांशी गप्पा मारत उभा राहिला. म्हंटल कदाचित तिची ऑर्डर पूर्ण झाली नसेल. अजून थोडावेळ थांबावं.  तेवढ्यात साहेबी पोशाख केलेले दोघेजण मागून आले आणि लाईन आहे कि नाही हे न बघता सरळ काउंटर कडे जाऊन, ए पोऱ्या चाय लावच्या थाटात आपली ऑर्डर देऊन मोकळे झाले. तो मुलगाही तत्परतेने त्यांच sandwich करायला धावला. मी सांगतेय त्याला कि मी त्या लोकांच्या आधी आलेय. तरीही सॉरी म्हणून, माझी ऑर्डर आधी घ्यायचं त्याला सुचलं नाही. मग मी त्या सगळ्यांच्यावर तोंडसुख घेतलं. त्याचाही कोणावर काही परिणाम झाला नाही.

शाळा-कॉलेजात असताना मनावर ठसलं होतं कि इंडिया इज अ थर्ड वर्ल्ड कंट्री. मग मध्ये खुप वर्ष गेली. बरेच बदल झाले. मोठमोठ्या अंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या पॉश शोरूम्स मुंबईत सगळीकडे उघडल्या. न्यूयॉर्कच्या तुलनेत सरस ठरतील अशा टोलेजंग इमारती रोज नव्या ठिकाणी उभ्या राहू लागल्या. पेपरवाले भारत आणि चीनच्या प्रगतीची तुलना करू लागले. लिंकन टनेल मध्ये शिरताना भारतीय पर्यटन विभागाच्या मोठ्ठ्या बोर्डवरची India Shining हि जाहिरात वाचून मला वाटायला लागलं कि खरंच 'इंडिया इज अ थर्ड वर्ल्ड कंट्री' चे दिवस मागे पडलेले दिसतात.

पण आजही मुंबईला गेलं कि कोपऱ्या-कोपऱ्यावर कचऱ्याचे ढीग वाहताना दिसतात. बेवारशी कुत्री, गाई तो कचरा हुंगत असतात. वाहतुकीचे नियम कोणी पाळत नाही. मग गाड्यांची टक्कर झाली कि चालवणारे खाली उतरून आपसात मारामारी सुरु करतात. गजबजलेल्या भर चौकात एकमेकाला लाथा मारतात, गुददा गुददी करतात. आजुबाजुला बघ्यांची गर्दी जमते. पोलिस जवळ फिरकतही नहित. थोड्यावेळानी मारामारी संपते. जो तो आपल्या मार्गी लागतो. कोणालाच त्यात काही विशेष वाटत नाही. लाल सिग्नलला न जुमानता एखादी गाडी निघून जाते आणि हवालदार बिचारा शिट्टी वाजवत तिच्या मागे पळत तिला थांबवायचा केविलवाणा प्रयत्न करतो. तोपर्यंत ती गाडी पुढच्या सिग्नलच्याही पलीकडे गेलेली असते.

हे आणि असं सगळं बघितलं कि वाटतं, we are still very much a Third World country.


PS:

प्रेसिडेंट केनडींच्या भाषणातील एक प्रसिद्ध वाक्य आहे- जे अमेरिकन टी व्ही वर बरेचदा दाखवतात - "Ask not what your country can do for you. Ask what you can do for your country".

भारताबाहेर राहून भारताला नावं ठेवणं केव्हाही चूकच. आजपर्यंत भारतानी जी प्रगती केली ती अर्थातच जे लोक तिथे राहतात त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्याच कष्टांमुळे. काही एन-आर-आय मंडळींनी जाऊन- येउन, आपल्या उद्योगधंद्यांच्या शाखा तिकडे उघडून वगैरे हातभार लावायचा प्रयत्न केला असेल - नाही असं नाही. पण फार थोडा. मुख्य योगदान अर्थातच तिकडे रहाणाऱ्या लोकांच.

आणि तरीही पन्नास-साठ वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरूंच्या मनाला भावलेल्या रॉबर्ट फ्रोस्टच्या कवितेच्या ओळी देशातल्या आणि देशाबाहेरच्या भारतीयांना आजही तितक्याच लागू होतात असं वाटतं… 

The woods are lovely, dark and deep, 
But I have promises to keep, 
And miles to go before I sleep, 

And miles to go before I sleep.                                             

                                                   
                                                   























Saturday, February 9, 2013

Sledding in Riverside Park


A beautiful cold, sunny, Saturday morning in New York city.  Overnight snowfall in Central Park was 11 inches. Current temperature is about 28 (F) degrees.